औरंगाबादः जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर शिवसेना नेत्यांमध्ये संताप आहे. अशातच औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी तर नवनीत राणांना चांगलंच सुनावलंय.
जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात…. ती काय आम्हाला हनुमान चालिसाचं महत्त्व सांगणार? ती आम्हाला शहाणपण शिकवते का? तिच्याविषयी आमच्याकडे बोलूच नका… असं वक्तव्य खैरेंनी केलं.
जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांनी हनुमान चालिसासाठी कसं आंदोलन केलं, याचं वर्णन केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रावरील संकटासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणण्याची विनंती केली. पण त्यांनी मान्य केली नाही. उलट मलाच इशारा दिला. ज्या पायांनी मुंबईत याल, त्यावर परत जाणार नाहीत म्हणाले… यावर तू ठाकरे है तो मै भी राणा हूं, मुंबई की लडकी, विदर्भ की बहूँ हूं.. असा इशारा देत मी हनुमान चालिसाची भक्ती सुरूच ठेवली, असं वर्णन राणांनी केलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकल्यानंतरही मी 12-12 तास हनुमान चालिसा म्हटलं, त्यामुळे आज त्यांच्या दारात कार्यकर्तेही उभे राहत नाहीत, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय.