पुणे : मावस भावाने बहिणीवर केलेल्या अत्याचाराची घटना घडली. धावत्या रेल्वेत बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नराधम भाऊ हा ‘मर्चंट नेव्ही मधील इंजिनीअर आहे. त्याच्या या कृत्याने मोठी खळबळ उडाली. दरम्यान, याप्नरकरणी राधम मावस भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
ही संतापजनक घटना आठ वर्षांपूर्वी 14 जुलै 2015 रोजी हरिद्वार ते पुणे धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी मावशीच्या घरी घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने नराधम मावस भाऊला शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी हा निकाल दिला. आरोपी हा ‘मर्चंट नेव्ही मधील इंजिनीअर आहे. तसेच त्याचे वय 32 वर्ष आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) (एफ) नुसार बलात्कार आणि कलम 307 नुसार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली. याबाबत पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पीडितेसोबत ही संतापजनक घटना घडल्यानंतर ती घाबरुन गेली होती. त्यामुळे तिने पुण्यात आल्यावर याबाबत तिच्या मावशीला आणि मैत्रिणीला सांगितले. यानंतर दुसऱ्या दिवशी पीडितेच्या मैत्रिणी तिच्या मावशीच्या घरी आल्या. त्यावेळी पीडिता त्यांना रेल्वेत घडलेली घटना सांगत असताना आरोपी मावस भाऊसुद्धा तेथे आला. यावेळी त्याने पीडितेला जमिनीवर ढकलले आणि तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मावशीने आणि पीडितेच्या मैत्रिणीने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी नराधमाने त्यांनाही मारहाण केली आणि घरातून पळ काढला.