मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता आणखी मोठा धक्का बसला आहे. यावेळी शिवसेना ही आता थेट घरातूनच फुटताना दिसत आहे. कारण ठाकरे घराण्याचे वंशज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई देखील आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील आणि निहार ठाकरे यांचा 2021 मध्ये विवाह झाला. मुंबईत त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला होता.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचं 1996 मध्ये अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहेत.