मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतच चालले आहे. ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे आधीच पक्षात दोन गट निर्माण झाले आहे. त्यात एक एक करून शिंदे गटात सामील होत आहे. अशातच आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील उपनेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली होती. खोतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर अर्जुन खोतकर लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे छावणीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र खोतकर यांनी याबाबत अजून घोषणा केली नाही. दरम्यान औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची वेळही जाहीर करून टाकली.
दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यात आज बैठक झाली आहे. त्यामुळे खोतकर एकनाथ शिंदे गटात येतील की नाही हे काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र अब्दुल सत्तार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सिल्लोड मतदार संघात ते मेळावा घेणार आहेत. याच मेळाव्यात खोतकरांचा शिंदे गटात प्रवेश होईल”. अब्दुल सत्तारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर खोतकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
अर्जुन खोतकर कोणाला पाठिंबा देणार-
अर्जुन खोतकर यांनी काही दिवसांपूर्वी मी आयुष्यभर शिवसेनेतच राहणार असल्याचे सांगितले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपनेतेपदाची जबाबदारी खोतकर यांच्यावर सोपवली होती. मात्र खोतकर यांनी थेट दिल्ली गाठून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात एकनाथ शिंदे यांनी समझोता केल्याचे मानले जात आहे. दोन्ही नेते जालन्यातील रहिवासी असून २०१९ मध्ये त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार-खासदारांच्या बंडखोरीनंतर अर्जुन खोतकर कोणाला पाठिंबा देणार, अशी चर्चा रंगली आहे.