पाचोरा,(किशोर रायसाकडा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक व निकटवर्तीय मानले जाणारे किशोरअप्पा पाटील यांनी बंड केल्या नंतर शिवसेनेचे माजी आमदार स्व.आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या सौ. वैशाली सूर्यवंशी यांचं आज पाचोरा शिवसेना कार्यालयावर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं बॅनर झळकल्याने पाचोरा – भडगाव मतदार संघात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्याशी ‘नजरकैद‘ ने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पाचोरा शिवसेना कार्यालयावर लावण्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर बाबत व भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, आज पण आणि उद्या पण मी उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे, उद्धव ठाकरें यांनी स्व. आर. ओ. तात्या पाटील यांच्यावर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास कायम जपला जाईल. त्यामुळे मी उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबतचं राहणार आहोत.
वैशालीताई मातोश्रीवर असल्याची मतदार संघात चर्चा
पाचोरा शिवसेना कार्यालयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर झळकल्या नंतर शिवसेनेचे माजी आमदार स्व.आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या सौ. वैशाली सूर्यवंशी या ‘मातोश्री‘ वर गेल्या असल्याची जोरदार चर्चा आहे,मात्र याबाबत वैशालीताई यांनी मी पाचोरा येथेच असल्याचं सांगितलं आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लढणार ?
शिवसेनेचे माजी आमदार स्व.आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या सौ. वैशाली सूर्यवंशी यांच्या उद्धव ठाकरेंच्या सोबत गेल्याच्या निर्णयाने आमदार किशोरअप्पा पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेने जबाबदारी दिल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नाला उत्तर देतांना सौ. वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की पुढचं पुढे पाहू…. सध्या तरि तसं डोक्यात नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र पाचोरा – भडगाव मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार किशोरअप्पा पाटील विरुद्ध सौ. वैशाली सूर्यवंशी असंच चित्र रंगणार की काय अशीच चर्चा रंगली आहे.
कार्यकर्ते मात्र संभ्रमात…
पाचोरा शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयावर उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोघांचे बॅनर लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. येणाऱ्या काळात शिवसेना कार्यालय नेमके कोणाचे हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो असं बोलल्या जात आहे.