रांची : झारखंड मक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपला धक्का देणारं वक्तव्य केलं आहे. झारखंडमधील भाजपचे १६ आमदार आमच्या संपर्कात असून ते हेमंत सोरेन सरकारला पाठिंबा देतील, असं वक्तव्य सुप्रियो भट्टाचार्य यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सुप्रियो भट्टाचार्य यांनी राज्यातील भाजपचे १६ आमदार अस्वस्थ आहेत त्यामुळं ते झारखंड मुक्ती मोर्चाला पाठिंबा देऊ शकतात. सुप्रियो यांच्या मते भाजपचे १६ आमदार वेगळा गट स्थापन करुन सोरेन सरकारला पाठिंबा देऊ शकतात. आमचा पक्ष १६ आमदारांच्या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत असल्याचं म्हटलं. झारखंडमध्ये भाजपचे २६ आमदार आहेत.
सुप्रियो भट्टाचार्य यांना पत्रकारांनी हेमंत सोरेन यांच्या सरकारला धोका असल्याचं विचारलं होतं. काही काँग्रेस आमदारांना भाजपकडून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचं विचारल्यावर सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपचे १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं.