मुंबई : राज्यात शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यामुळे राज्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेससाठीही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.आता सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे.
दिल्लीत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट आहे. त्यामुळे, राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या भेटीनंतर ते आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करणार का? याकडेच लक्ष लागलं आहे. राजन पाटील हे माजी आमदार आहेत. तर, बबनदादा शिंदे हे माढा मतदारसंघाचे आमदार आहेत.
माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यत्र शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी बैठक घेतली होती. अशात आता राजन पाटील यांनी दिल्लीत जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.