सांगली : हल्ली कधी काय होऊ शकते याचा तुम्ही नेमही लावू शकत नाही. आपण अनेकवेळा वस्तूंसह पैशांची चोरी होते, अशा घटना ऐकल्या किंवा पाहिल्यात असेल. मात्र अशातच बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सांगलीच्या तासगाव मध्ये नर्स असल्याचे भासवून एका महिलेने डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यातून एक दिवसाच्या चिमुरड्याचे अपहरण केल्याचाप्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार आज (दि. 24) सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी सबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.
तासगाव येथील सिध्देश्वर चौकातील डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यात एक महिला प्रसूत झाली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचे भासवून सबंधितांच्या वार्डमध्ये गेली. तेथून एक दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या काखेतील बॅगमध्ये टाकले. या बालकाला घेऊन महिलेने क्षणार्धात पलायन केले. या घटनेने हॉस्पिटलसह शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
सांगलीमध्ये नर्स असल्याचे भासवून एक दिवसाच्या चिमुरड्याचे अपहरण pic.twitter.com/O2IMn4363L
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) July 24, 2022
दरम्यान, आता सांगली पोलिसांकडून या बाळचोरी प्रकरणी आरोपी महिलेची पोलिसांकडून ओळख पटवील जातेय. तसंच तिचा शोध घेण्यासाठी पथकंही तैनात करण्यात आली असून या महिलेला पकडण्याचं आणि एक दिवसाचं बाळ सुखरुप पुन्हा त्याच्या आईजवळ सोपवण्याचं आव्हान तासगाव पोलिसांसमोर उभं ठाकलंय.