नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धापेवाडा येथे एक धक्कदायक घटना समोर आलीय. पर्सनल डायरी काका-काकूच्या हातात लागल्यानंतर एका उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या करत जीवन संपवले. निकिता डहाट असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
निकिता डहाट लहानपणापासूनच आजोबा रामाजी डहाट यांच्यासह धापेवाडा येथे राहत होती. तिला आई, मोठी बहीण व भाऊ आहेत. तिने एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतले होते. तसेच एका खासगी कंपनीत तिला नुकतीच नोकरोदेखील लागली होती. याप्रकरणी तिच्या भाऊ पंकज याने पोलिसांत तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृत तरुणीला लहानपणापासूनच रोज डायरी लिहिण्याची सवय होती. तिच्या चुलत बहिणीची काही महिन्यांअगोदर शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे तिच्या काकाने निकीताला मदतीसाठी बोलावून घेतले होते. मात्र, इथे आल्यानंतर तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. काका-काकूने तिला 15-20 दिवस अक्षरश: नोकराप्रमाणे वागणूक दिली. इतकेच नव्हे तर चुलतबहिणीसोबतच पुणे येथे जा यासाठी दबावही टाकला. मात्र, तिच्या आजोबांनी याला नकार दिला. तर निकिताला मिळालेल्या वागणुकीमुळे तिने आपल्या पर्सनल डायरीत काकूला ‘डेव्हील ऑफ द फॅमिली’ असे उद्देशून लिहिले होते.
दरम्यान, 24 एप्रिल रोजी काका-काकू धापेवाडा येथे आले असता त्यांनी निकीताची डायरी वाचली व त्याच्या काही पानांचे फोटो काढले. याबाबत निकीताला माहित झाल्यावर ती तणावात आली होती. तसेच काका व काकू माझी बदनामी करतील, अशी तिला भिती वाटत होती. निकिताने मला ‘डेव्हील’ कसे काय लिहिले याचा सर्व नातेवाईकांसमोर जाब विचारू, अशी काकूने भूमिका घेतल्याने निकिता तणावात आली होती. याच तणावातून तिने 14 जुलैला गळफास घेत आत्महत्या केली.