मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाहीये. त्यात शिंदे सरकारने अजूनही मंत्रीमंडळ विस्तार केला नाही. शिवसेना आणि शिंदे गट यांची अंतर्गत लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली असून त्यावर अद्याप सुनावणी होणे बाकी आहे. त्यातच आज राऊत यांनी ट्वीट करत राजभवनातला एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टची सध्या राजकारणात चर्चा रंगली आहे.
संजय राऊत यांनी बहुमताचे पत्र राज्यपालांना देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर भाजपा नेत्यांचा फोटो पोस्ट केला आहे. या ट्वीटसोबत त्यांनी “उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिआ तो कब्र पर भी जल रहा है!” “वेट अँड वॉच” असे कॅप्शन देत सूचक इशारा दिला आहे.
उनकी मुस्कुराहट पर न जाना,
दिया तो कब्र पर भी जल रहा है!!
Wait and watch. pic.twitter.com/rMZnNILHs1— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2022
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा- संजय राऊत
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राऊतांनी आता निशाणा साधलाय. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायद्याला धरून झालेलंच नाही. कायद्याला धरून झालं असतं तर आतापर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. पण तो झाला नाही. याचाच अर्थ कायद्याचा आणि घटनेचा काही तरी पेच निर्माण झाला आहे. नाही तर जे सरकार फक्त सत्तेसाठी निर्माण झालं आहे, असं राऊत म्हणाले.
जे आमदार केवळ मंत्रिपदासाठी फुटले आहेत ते इतके स्वस्थ का बसले असते? कारण त्यांना माहीत आहे. आपण शपथ घेतली तर आपली आमदारकी धोक्यात येईल आपलं सरकार धोक्यात येईल, म्हणूनच ते स्वस्थ आहेत. तर पुढे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे.