मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह बंड करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं होते. त्यानंतर अनेक पालिकांतील नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचत शिंदे यांनी ठाकरेंना जोरदार आव्हान दिलं आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी बुधवारी रात्री उशिरा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
खासदारांनाही आपल्या गटात खेचण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री शिवसेनेचे १८ पैकी तीन खासदार वगळता इतर तब्बल १५ खासदार शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. या खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरे यांची आगामी राजकीय वाटचाल आणखी खडतर होणार आहे.
हे पण वाचा :
तरूणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना
राज्यात पावसाचा धुमाकूळ ! आज काय आहे पावसाचा अंदाज? जाणून घ्या
गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा
नोकरीच्या शोधात आहात का? कॉन्स्टेबल पदाच्या 1411 जागांसाठी भरती, 69 हजारापर्यंतचा पगार मिळेल
एकनाथ शिंदेंचं बंड आणि ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाला हादरे
शिवसेनेते ‘मातोश्री’चा अर्थात ठाकरे कुटुंबाचा आदेश अंतिम मानला जातो. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संघटनेवर घट्ट पकड असल्याचं बोललं जात होतं. मात्र पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि थेट ठाकरे कुटुंबालाच आव्हान दिलं. शिंदे यांनी शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार आपल्या गटात आणत ताकद दाखवून दिली. तसंच आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटात सामील झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा हादरा बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.