मुक्ताईनगर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने विषप्राषण करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १६ मे २०२२ रोजी घडली होती.दरम्यान दोन महिन्यांनंतर ‘पोस्ट मार्टम रिपोर्ट’ आल्यानंतर मयत अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार न देण्याची भुमिका घेतली त्यामुळे अखेर महिला व बाल समितीच्या अहवालावरुन पोलिस स्वत:च फिर्यादी झाले असून या प्रकरणी शनिवारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात CCTNS NO २४५ / २०२२ भादवि कलम ३७६, पोक्सो कलम ४,५ J (२), ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय होती घटना…
मुक्ताईनगर तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या लहान बहिणी समोरच शेतात जाऊन विष प्राषण केले होते .या मुलीला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जळगाव येथे दाखल करण्यात आले. त्या मुलीचा उपचारादरम्यान तासाभरात मृत्यू झाला होता.तिने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नव्हते अखेर पोलिसांनी व्हिसेरा राखीव ठेऊन पोस्टमार्टमचा अहवाल मागवला होता सदर अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्राप्त झाल्याने, अहवालात मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली.
आत्महत्या केलेली मुलगी गर्भवती असल्यामुळे प्रकरण संशयास्पद असल्यामुळे पोलिसांनी हा अहवाल महिला व बाल कल्याण समितीसमोर सादर केला. तेथे मृत मुलीच्या पालकांना बोलावण्यात आले. त्यांनी या संदर्भात काहीच माहिती नाही, आमचा कोणावरही संशय नाही, आम्हाला तक्रार द्यायची नाही अशी भूमिका घेतली.दरम्यान अखेर समितीने पोलिसांना आदेश करुन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल श्रावण जवरे यांच्या फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर तपास करीत आहेत.