पुणे : आगामी 5 दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उद्या सोमवारपासून कोकण आणि विदर्भात (Orange Alert) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच यामध्ये सातत्य राहणार असल्याने जुलै महिन्यात चित्र बदलेन असा विश्वास आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यात कमी-अधिक पावसाच्या जोरावर गेल्या महिन्याभरात 60 लाख हेक्टरावर खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी कडधान्याला बाजूला सारुन सोयाबीन आणि कापसावरच भर दिला आहे. असे असले तरी पावसाने दिलेली ओढ यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच पण अशीच स्थिती राहिली तर दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. जुलै महिन्यातील पावसावरच खरिपाचे भवितव्य ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच महत्वाचा आहे. ऐन गरजेच्या वेळी वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली तरच खरिपातील उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
गेल्या महिन्याभरात सरासरीएवढा पाऊस झाला नसला तरी आता यामध्ये अमूलाग्र बदल होणार आहे. केवळ कोकणातच नाहीतर मराठवाड्यातही विजेंच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे. सोमवारपासून कोकण आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी 3 ते 8 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. त्यामुळे जून महिन्यात पावसाची भासलेली उणीव या महिन्यात पूर्ण होईल का हे पहावे लागणार आहे. आतापर्यंत कोकण आणि विदर्भात बरसत असलेला पाऊस राज्यात सक्रीय झाला तरच खरिपातील पिकांना जीवदान मिळणार आहे.