सांगली,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातल्या ९जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. या सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं मात्र वनमोरे कुटुंबातील सर्व सदस्यांना मांत्रिकानेच विष दिल्याची माहिती समोर अली आहे. या प्रकरणी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे ४८ रा. सर्वदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय ३९ रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट सोलापूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान या प्रकरणात मोठा धक्कादायक उलगडा झाल्याने खळबळ उडाली आहे,या मांत्रिकाने वनमोरे कुटुंबातील सदस्यांना विष दिल्याची माहिती समोर आली आहे. १९जून ही गुप्तधन मिळण्याची डेडलाइन ठरली होती. त्या दिवशी गुप्तधन मिळेल असं सांगून मांत्रिकाने वनमोरे कुटुंबातील ९ जणांना वेगवेगळ्या खोलीत थांबायला सांगितलं. यानंतर घरातील सर्व दिवे घालवण्यास सांगितलं. यानंतर प्रत्येक सदस्याला काळ्या चहातून विष देऊन त्यांचा खून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
आरोपीस आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयाने ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अब्बासला अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता छातीत दुखत मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यास डिस्चार्ज मिळताच अटक करून पुढील तपास केला जाणार आहे.