मुंबई,(प्रतिनिधी)- राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेते पदावरून हटविण्यात आले आहे. शिवसेनेचे ३९ आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्याच्या विरोधात शिवसेना पक्षा कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असे वक्तव्य केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाईचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केलं आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची नावे घेतली होती, तसेच ते शिवसेनेचेच मुख्यमंत्री असल्याचे देखील सांगत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे.ही पक्षांतर्गत कारवाई असून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचे नेतेपद काढण्यात येईल असे सांगण्यात येत होते मात्र तेव्हा ते कायम ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता पत्र जारी करत ही कारवाई केली आहे.