मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर २४ तासाच्या आत राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
दरम्यान, आता नवं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे काय निर्णय बदलणार किंवा कोणते निर्णय रद्द करणार याकडे लक्ष लागून होतं. त्यानुसार या नव्या सरकारनं पहिले दोन महत्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
शिंदे सरकारनं आल्या आल्या ‘आरे’मध्येच मेट्रो कार शेड होणार असल्याचं राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांना कळवलं आहे. आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, अशी माहिती सूत्रांनी दिली असल्याचं वृत्त ANI नं दिलं आहे.
दुसरं महत्वाचं म्हणजे राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याबाबत नव्या सरकारनं निर्देश दिले आहेत, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळाल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हे दोन्ही निर्णय ठाकरे सरकारच्या काळात चांगलेच गाजले होते. मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. यावरुन मोठा गदारोळ देखील झाला होता. आरेमधील मेट्रो शेड विरोधात नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता.