जळगाव जिल्ह्यातील भोकर गावातील अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्याच्या गुन्ह्यात एका आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व १ लाख १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सोमवार दिनांक ९ रोजी जळगाव न्यायालयाने सुनावली आहे.
काय आहे घटना…
यश उर्फ गोलू चंद्रकांत पाटील (रा. डांभुर्णी, ता. यावल) असे आरोपीचे नाव आहे. डांभुर्णी येथे १२ मार्च २०२० रोजी एका लग्नाच्या निमित्ताने आरोपी यश आला होता. दरम्यान त्याने गावातील ११ वर्षीय मुलाशी ओळख निर्माण करून शौचास जाण्याच्या बहाण्याने त्याला गावाबाहेर घेऊन गेला. त्याठिकाणी यशने अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा खून केला. अल्पवयीन मुलगा घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली. १६ मार्च रोजी पोलिसांना बालकाचा मृतदेह आढळून आला. याच दिवशी पोलिसांनी संशयावरून यशला अटक केली होती.
तपासा दरम्यान आरोपीची गुन्ह्याची कबुली…
संशयित म्हणून आरोपी यश ला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तपासा दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी दोषारोप तयार करून १० जून २०२० राेजी न्यायालयात सादर केले होते.
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल…
मे.जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाने एकूण बारा साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने गावातील त्या दिवशी बर्फाचा गोळा विकणारा अनिल भोई, शवविच्छेदन करणारे डॉ. नीलेश देवराज, लक्ष्मण सातपुते, नायब तहसीलदार व इतर पंच यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने आरोपी यश याला दोषी धरून शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.