मुंबई: सशर्त जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण जामीनासाठी असलेल्या अटींचा भंग झाल्याने राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी सरकारच्यावतीने आज सत्र न्यायालयात करण्यात आली. राज्य सरकारच्या या अर्जावर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. तुमचा रद्द का करू नये याचे उत्तर न्यायालयाने राणा दाम्पत्याकडे मागितले आहे.
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. यामध्ये माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अटींचा भंग केल्याची तक्रार सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सत्र न्यायालयात केली. या अर्जावर आज सुनावणी झाली.
आम्ही तुमचा जामीन रद्द का करू नये, असे स्पष्टीकरण राणा दाम्पत्याकडून मागवण्यात आले आहे. यावर आता राणा दाम्पत्याकडून काय भूमिका मांडली जाते, हे पाहावे लागेल. या प्रकरणाची लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. तुर्तास राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत.