जळगाव : जळगावमध्ये शिक्षण घेत असलेल्या यावल तालुक्यातील एका २० वर्षीय तरूणाला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तरुणीला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोपा आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विशाल राजेश तडवी (वय २३) या तरुणाला अटक केली आहे.
काय आहे प्रकार?
यावल तालुक्यातील २० वर्षीय तरूणी जळगावमध्ये एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत राहते. यादरम्यान तिची ओळख विशाल राजेश तडवी याच्याशी झाली. ओळखीतून दोघांमध्ये प्रेम बहरले, अशी माहिती आहे.
पुढे शहरातील एका भागात आरोपी विशाल याने भाडेकरारावर एक फ्लॅट घेतला. विशाल याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत या फ्लॅटवर नेवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याचदरम्यान आरोपी विशाल तरुणीकडे पैश्यांची मागणी करू लागला. पैसे दिले नाही, तर शिवीगाळ करून तरुणीला मारहाण करायचा आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचा, असं पीडित तरुणीने म्हटलं आहे.
लग्नाचे आमिष दाखवून विशाल हा आपल्यावर अत्याचार करत आपली फसवणूक करत असल्याची तरुणीला लक्षात आले. यानंतर घडलेल्या याप्रकाराबाबत तरुणीने थेट रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. २८ ऑक्टोबर २०१८ पासून ते आजपर्यंत घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती तिने तक्रारी करत दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी विशाल तडवीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विशाल तडवी याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करत आहेत.