मुंबई : सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. दरम्यान, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली आहे. दरम्यान, मनसेकडून पुण्यात 3 मे रोजी महाआरती आणि हनुमान चालीसाचं पठण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण तो कार्यक्रम एकदिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली होती. हीच बातमी ताजी असताना राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली महत्त्वाची भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंनी या ट्विटमध्ये महाराष्ट्र सैनिकांसाठी मोलाची सूचना दिली आहे.
पोस्टमध्ये काय संदेश?
“उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन”, असा संदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना ट्विटरवरुन दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा पार पडल्यापासून या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणीन अजानच्या वेळी मनसेकडून हनुमान चालीसाही लावण्यात आली. त्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा काल सरकारला औरंगाबादेत इशारा दिला. त्यानंतर मनसैनिक सज्ज होते. मात्र राज ठाकरेंच्या या संदेशामुळे आता मनसैनिकात संभ्रम निर्माण होणार का? हेही पाहण महत्वाचं ठरणार आहे.