पुसद : पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला. झोका देत असताना अचानक सिमेंटचा खांब डोक्यात पडल्यामुळे 6 महिन्यांचा तेजस व 9 वर्षाची प्राची या बहिण भावांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना यवतमाळमधील पुसद येथे घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
यवतमाळमधील पुसद येथे विजय घुक्से आपल्या कुटुंबासोबत राहतात. ते कुटुंब शेतकरी असून त्यांना 4 अपत्य आहे. घुक्से यांचे लक्ष्मीनगर येथे शेत असून ते गाजर काढण्याचे काम करीत होते. तर आई सारिका 6 महिन्याच्या तेजसला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती.
सकाळी 11 वाजता घुक्से यांची मोठी मुलगी प्राची शाळा आटोपून शेतात आणि भूक लागली म्हणून आईला जेवण दे असे म्हणाली. आईने तिला तेजसला झोका दे असे म्हणून घरात गेली. तितक्यात ज्याला झोका बांधला होता तो सिमेंटचा खांब अचानक तुटून प्राचीच्या डोक्यावर पडला आणि ती बेशुद्ध झाली तर तेजस जोरात बाजूला फेकला गेला.
आईने हा प्रकार पाहून आरडाओरड केली. आवाज ऐकून वडील विजय धावत आले आणि चिमुकल्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राचीला मृत घोषित केले तर तेजसला नांदेड येथे रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच त्याचीही प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे घुक्से कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.