पुणे : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना एका गुन्ह्यात अडकवून मोक्का लावण्याबाबत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी रचनलेल्या षडयंत्राबाबत चे पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केले होते. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता महाजन यांनी थेट पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, याच पोलीस ठाण्यात महाजनांवर गुन्हा दाखल आहे.
याच प्रकरणावरून मोठा गदारोळ सुरू झाला असून महाजनांच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होण्याची चिन्हे आहेत.
या प्रकरणाची गंभीरता बघता, ज्या पद्धतीचे पुरावे देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले आहेत ते पाहता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, असेही महाजन यांनी सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. जेणेकरून या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी सीबीआयकडून करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.