मुंबई : सध्या राज्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर असून आघाडीतील अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. ईडीची (ED) कारवाई होत असताना शिवसेनेच्या शिलेदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्यामुळे नेमकी आता शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर आज शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या स्नेहभोजन आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. आज रात्री ८.०० वाजता वर्षा बंगल्यावर मेजवानी स्नेहभोजन आहे.
दरम्यान, मंगळवारी ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली. पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ईडीकडून ‘पुष्पक ग्रुप’ची ६.४५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांचे मेहुणे थेट ईडीच्या रडारवर आल्याने चर्चेला उधाण आले आहे.