नांदेड : एसटी विभागाला शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशातच आणखी एका कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. गंगाधर येवतीकर (वय 48) असं मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आगारात गंगाधर येवतीकर चालक म्हणून कार्यरत होते. मुखेड शहरातील कंधार फाटा येथील राहत्या घरी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात येवतीकर सहभागी होते. मागील तीन चार महिन्यापासून पगार नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकड झाली होती.
याच निराशेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी देखील सिडको येथील एका चालकाने आत्महत्या केली होती. तर एका कर्मचाऱ्याचा मेंदूच्या रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला होता.