नवी दिल्ली : देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य होरपळून जात आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज घरगुती गॅस सिलेंडरही महागला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आज मंगळवारपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता जळगावात १४ किलोचा गॅस सिलिंडर ९५४.५० रुपयांचा झाला आहे. तर मुंबईत सिलेंडरची किंमत ९४९. ५० रुपये झाली आहे. मागी वर्षी ६ ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळं आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.
काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यानंतर आज घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडणार आहे. दरम्यान दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत ९४९. ५० रुपये इतकी आहे.