अमळनेर। शहरातील नगरपालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या घंटा गाडीत मयत नवजात अर्भक आढळून आले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, अमळनेर नगरपालिकेच्या घंटागाडीवर फिरोज समसोद्दिन खाटीक (वय-४५) हे १९ मार्च रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास शहरातील वार्ड क्रमांक ८ येथील सम्राट कॉलनी, द्वारका नगर, बोरसे गल्ली, रामकृष्ण कॉलनी या परिसरातून ओला व सुखा कचरा जमा करून नगरपालिकेच्या टेकडीवरील कचरा डेपो येथे गाडी खाली करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कचरा डेपोवर काम करणाऱ्या महिलांना एका कागदात आणि प्लास्टिकच्या पिशवीत पुरूष जातीचे नवजात अभ्रक मयतस्थितीत आढळून आला. हा प्रकार पाहून महिलांना धक्का बसला. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व चालक फिरोज खाटीक यांना देण्यात आली. त्यांनी कचराडेपो येथे धाव घेतली. त्याचप्रमाणे अमळनेर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी घंटागाडीचे चालक फिरोज खाटीक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हटकर करीत आहे.