मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने (bjp) शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. एमआयएम सोबत युती होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विरोधकांच्या मतदारसंघात शिवसेना वाढवा. शिवसेनेची (shivsena) ताकद राज्यभर वाढवा, असे आदेश देतानाच शिवसंपर्क अभियानाचं मिशन यशस्वी करूनच या, अशा शुभेच्छाही त्यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. तसेच येत्या काळात आपणही महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी एमआयएमसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना ही प्रखर राष्ट्रवादी पक्ष आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला आहे. तो विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आपल्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. त्याला बळी पडू नका. राज्यातील जनतेत जो संभ्रम निर्माण होत आहे, तो दूर करा, असं उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि जिल्हा प्रमुखांना सांगितलं.