आशिया आणि युरोपमध्ये करोना रुग्णसंख्या वाढू लागली असतांना जगासमोर पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचे संकट येऊ पाहत आहे. चीन आणि हॉंगकॉंग सारख्या देशात ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेल्या BA.2 विषाणूने धुमाकूळ घातला असल्याचं ताज्या कोरोना आकडेवारी वरून समोर आलं आहे.
दरम्यान आशिया आणि युरोपमध्ये करोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला असून आपली सुरक्षा कमी करु नका अशी सूचना केली आहे.टेस्ट, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि करोनाच्या नियमांचं पालन केलं जावं, अशी सूचना केंद्राने जारी केली आहे.केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्याच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना पंचसूत्री धोरणावर लक्ष देण्यास सांगितलं आहे.
दरम्यान चीन मधील अनेक प्रांतात लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीये. या सर्व पार्श्वभूमीवर 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात यावी की नाही? याबाबत चर्चा झाली. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे.या बैठकीला आरोग्य सचिवांसह सरकारचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. भारतामध्ये बुधवारी कोरोनाच्या 2,876 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 32,811 वर पोहोचला आहे. भारतामध्ये सध्या कोरोनाची साथ अटोक्यात आहे, मात्र भविष्यात ती वाढू नये यासाठी काय प्रयत्न करायला हवेत यावर देखील या बैठकीत चर्चा झाली.