मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सोमवारपर्यंत प्रवीण दरेकर यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान प्रशासनाने उत्तर देण्यासाठी वेळ मागितला म्हणून न्यायालयाने त्यांना वेळ देत पुढील सुनावणी सोमवारी ठेवलेली आहे, अशी माहिती दरेकरांचे वकील अखिलेश चौबे यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने दरेकरांची ही याचिका फेटाळून लावल्यानंतर आज प्रविण दरेकर यांच्यावतीनं सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयानं विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. प्रविण दरेकर यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. प्रविण दरेकर यांच्यावर तोपर्यंत कठोर कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.