जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पवार हे १५ एप्रिलला तर श्रीमती सुळे २५ मे रोजी येणार आहेत.
शरद पवार यांच्या हस्ते १५ एप्रिल रोजी चांदसर (ता. धरणगाव) येथे माजी आमदार मु. ग. पवार याच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील जिल्ह्याचे आजी माजी मंत्री उपस्थित राहणार आहेत.
सुळेंच्या उपस्थितीत मुक्ताई सोहळा
तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या २५ मेस जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताई सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिली. त्यांनी सांगितले, की मुक्ताई हे संतपीठ आहे. त्याला ७२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मंदिरात सद्या नामजप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूर येथून विठ्ठलाच्या पादुकाही या ठिकाणी येतात. या कार्यक्रमाचा सांगता समारोह २५ मेस होणार असून त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.