सोयगाव : सततच्या नापिकी व विविध बँकेच्या कर्जाची फेड कशी करावी यातून आलेल्या नैराश्याला कंटाळून एका शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील डाभा येथे घडली. मंदाबाई मनोहर दांडगे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंदाबाई मनोहर दांडगे यांच्या पतीच्या नावे डाभा शिवारातील गट क्रमांक ५ मध्ये शेती आहे. त्यांच्या पतीने ग्रामीण बँक व बुलडाणा येथील बँक यांचे कर्ज घेतलेले होते. मात्र कधी अतिवृष्टी, कधी आवकाळी त्यामुळे शेतात सतत नापिकी होत असे. त्यामुळे बँकेचे कर्ज आपल्या नवऱ्याने कसे फेडावे याबद्दल त्यांना नेहेमीच चिंता सतावत होती. त्यात घरातील पाच ते सहा जणांचे जीवन शेतीवर असून शेतीतून मात्र काहीच उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे त्या नेहमीच चिंतेत असायच्या. तर यावेळी आता काय करावे समजत नव्हते आणि काहीच पर्याय समोर दिसत नव्हता.
तिकडे बँकेचा मार्च महिना असल्याने कर्ज भरण्याचा रेटा सुरू असल्याने शेती जप्त होईल, नवे-जुने करा या विषयावर घरात रोजच चर्चा चालायची. परंतु उत्तर काहीच मिळत नव्हते. अखेर शनिवारी (दि. १२) रात्री घरातील सर्वजण झोपेत असताना कर्जाला कंटाळून मंदाबाई हिने डाभा शिवारातील गट क्रमांक ५४ मधील विहिरीत आत्महत्या केली. या प्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.