जळगाव : शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेचे तीन चार खासदारही निवडून येणार नाही. शिवसेनेची परिस्थिती काँग्रेससारखी झाली आहे, असा घणाघात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी केला. दरम्यान, आठवलेंच्या या टीकेवर आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले की,‘रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील’, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णायक नेते नाहीत. त्यांनी बोलण्या अगोदर भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. त्यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. आठवलेंसारख्या नेत्यांना असं बोलणं शोभत नाही’, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.