नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत देशाचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. यात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सरकार वर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, या अर्थसंकल्पात पगारदार वर्गासाठी, मध्यम– मध्यमवर्गासाठी, गरीब, वंचित, तरुण, शेतकरी, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी काेणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. मोदी सरकारचा हा झिरो सम बजेट आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात सरकार कडून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. सरकारने 5 नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली आहे. लघु आणि मध्यम उदयोग साठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशातील राज्यांसाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सहकार क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. मात्र नोकरदार वर्गाची मात्र निराशा झाली आहे. जुनी कर रचनाच यापुढेही सुरू असल्याने नोकरदार वर्गाला दिलासा मिळू शकलेला नाही.