कासोदा प्रतिनिधी : खोदकाम करताना अचानक खजिना सापडला असा सीन तुम्ही एखाद्या सीरिजमध्ये किंवा सिनेमात पाहिला असेल. पण अशी एक घटना चक्क जळगावात घडली आहे. एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील समदाणी गल्ली मधील पडित घराची माती दि. २१ जानेवारी २०२२ रोजी भरत असतांना भिंतीला धक्का लागल्याने सदर भिंत पडली. त्यामुळे सदर भिंतीचे दगडमाती भरत असतांना त्याठिकाणी पुरातन काळातील जवळपास वीस चांदीचे शिक्के, ट्रॅक्टर चालकाला सापडले असता ते त्यांनी कासोदा पोलीस ठाण्यात जमा केले होते.
सदर घटनेची माहिती त्या गल्लीतील लोकांनी त्यांच्या मुलींना कळविल्यानंतर त्यांनी कासोदा पोलीसांशी संपर्क साधून माहीती घेतली असता फक्त वीस नाणी सापडल्याचे सांगण्यात आले परंतु संपूर्ण गावात गुप्तधन सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली व पुन्हा सदर घरमालक ताराबाई समदाणी यांचे जावाई व मुलगी प्रेमलता नवाल यांनी कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि निता कायटे यांच्याशी संपर्क करून विचारणा केली परंतु माहितीत तफावत वाटत असल्याने त्यांनी जळगाव पोलीस अधीक्षक यांना सदर घटनेची चौकशी करण्याचा लेखी अर्जाद्वारे केल्याने पोलीस अधीक्षक यांनी जळगाव गुन्हे शाखेचे पथकाला दि. २५ जानेवारी रोजी कासोदा येथे पाठवून सदर दि. २१ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेचे सोने व चांदीचे शिक्के संबंधीत घरमालकांनी पोलीस अधीक्षक जळगाव व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल द्वारे तक्रार केल्याने पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले आणि त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पाचारण केले.
दि. २५ जानेवारी रोजी गुन्हा शाखेच्या पथकाने जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव, ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे, संजय ऊर्फ सतिष साहेबराव पाटील, राहुल राजू भील या चौघांना जळगाव येथे नेले असता कासोदा पोलीसांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलीसांनी याबाबत वेळीच कसुन चौकशी केली असती तर अजून जास्तीचे ऐवज मिळून आले असते अशी गावात चर्चा सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सदर घटनेची सखोल चौकशी केली असता यात जवळपास आजच्या बाजार भावाप्रमाणे १९ लाख १७ हजार २८३ रुपयांपर्यंत किंमत असलेला पुरातन काळातील सोन्याची दागीने व चांदीचे शिक्के आढळून आले. सदर दागिने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी जालिंदर पळे यांच्या सोबत पोलीस नाईक नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, पोलीस अंमलदार सचिन महाजन व मुरलीधर बारी तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि निता कायटे यांच्यासह दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून कारकून सहाय्यक फौजदार भास्कर बडगुजर यांच्या ताब्यात दिला. कासोदा सपोनि निता कायटे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, तहसीलदार एरंडोल यांना कळविले असून पुढील कारवाई तालुका दंडाधिकारी यांना कळविले आहे.
आमचे वास्तुत कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर शिरून जेसीबीने माती भरतांना सापडलेले पुरातन शिक्के व सोने चांदीचे दागिने नेणाऱ्या सर्वांवर गुन्हा नोंद करून कोर्टात हजार करावे व आमचे वस्तू आम्हास सुपूर्द करावे व प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र सैनिकास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक पत्नी ताराबाई गणपती समदाणी यांची मुलगी प्रेमलता नवाल यांनी केली आहे.