जळगाव : ३३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरसोली येथे उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिरसोली येथील गिरीष प्रकाश पाटील (वय-३३) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते गेल्या १३ वर्षांपासून ते बांभोरी येथील जैन कंपनीत कामाला आहे. त्यांनी मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना मागच्या खोलीत गिरीष पाटील याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
आज सकाळी त्यांची पत्नी रेणूका ह्या झोपेतून उठल्या त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई सुनंदाबाई, वडील प्रकाश पाटील, भाऊ सतिष आणि पत्नी रेणूका असा परिवार आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.