मालेगाव : मालेगाव मध्ये काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. शहरातील एकूण २७ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. येत्या 27 तारखेला हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील. काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे आहे. त्यासाठी विविध निधी व योजनांना मंजूरी हवी आहे. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणीही मंत्री आम्हाला प्रतिसाद देत नाही. गेल्या दोन वर्षात मालेगाव शहरासाठी काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळेच आता काँग्रेस पक्षात राहून काहीही उपयोग नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. असे रशीद शेख म्हणाले.
रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासाहित 27 जण येत्या 27 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती रशीद शेख यांनी दिली. त्यामुळे काँग्रेस साठी हा खूप मोठा धक्का असून यामुळे आगामी काळात काँग्रेस राष्ट्रवादीत मोठा कलह होण्याची शक्यता आहे.