पाचोरा, (किशोर रायसाकडा )- ऑक्टोबर 2021 मध्ये तरुण मुलगी घरातून निघून गेल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. मुलीचा सर्वत्र शोध घेत असतांना अचानक दोन महिला पत्रकार यांनी मुलीच्या बापाला फोन करून तुमची शोधून देतो या नावानं वारंवार १६ हजार रुपये उकडल्या बाबत पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तालुक्यातील ग्रामीण भागात शेती व्यवसाय करणाऱ्या त्रस्त पित्याने पोलिसात फिर्याद दिली आहे की, गेल्या ऑक्टोबर 2021 मध्ये तरुण मुलगी घरातून निघून गेल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात व्यस्त असताना ता 5 जानेवारी रोजी चंचल सोनवणे नामक मुलीने भ्रमणध्वनीवरून सांगितले की, तुमची मुलगी हरवल्याची बातमी पोलिसांकडून आम्हाला मिळाली असून तुम्ही पाचोरा येथे भेटायला या. असे सांगितल्याने ता 6 जानेवारी रोजी दुपारी पाचोरा येथे आल्यानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती जवळच्या कार्यालयात बोलावल्याने तेथे गेलो असता चंचल सोनवणे व गौरी सोनवणे यांनी तुमची हरवलेली मुलगी परत आणून देतो. आमची एक टीम बाहेर काम करते. आम्ही आतापर्यंत चार पाच मुली शोधून आणून दिल्या आहेत. पण त्यासाठी थोडा खर्च लागेल असे सांगितले. त्यावेळी मी मुलीच्या प्रेमापोटी भावुक झालो व त्यांना दोन हजार रुपये दिले.
घरी आलो असता दुसऱ्या दिवशी पून्हा आम्ही कामाला लागलो आहोत तुम्ही 22 हजार रुपये आणून द्या. असे सांगितल्याने मी नातलगा सोबत त्यांचे भेटीसाठी आलो व त्यांना 10 हजार रुपये दिले. त्यानंतर माझ्या पत्नीस पाचोरा येथे उपचारासाठी आणले असता दोघां भगीनींनी दवाखान्यात जवळच असलेल्या घरी बोलावून घेतले. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी देखील तुमच्या मुलीचा शोध लागलेला आहे. माझ्या मुली जसे सांगत आहेत असे तुम्ही करा . त्यांना पैसे लवकर द्या असे सांगितले. परत तीन चार दिवसांनी त्यांचा फोन आला व उर्वरित रक्कम जमा करा असे सांगितल्याने मी पुन्हा नातलगां सोबत त्यांच्या ऑफिसला जाऊन 4 हजार रुपये दिले.त्यावेळी तुमच्या मुलीचा शोध लागला आहे. लवकरच तीला परत आणून देऊ असे सांगितले व मुलीचा बनावट पत्ताही त्यांनी सांगितला.
त्यानंतर मी आजतागायत वेळोवेळी फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन बऱ्याचदा बंद आला. पुणे येथील आमचा माणूस फोन उचलत नाही असे सांगून त्यांनी टाळाटाळ केली. तेव्हा मी माझी मुलगी परत आणून देत नसाल तर मी दिलेले 16 हजार रुपये परत द्या असे सांगितले असता त्यांनी मला तुमची मुलगी पळून गेली आहे अशी बातमी आमच्या साक्ष न्यूज चैनल वर प्रसिद्ध करून बदनामी करु अशी धमकी देत आणखी पैशांची मागणी केली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पाचोरा पोलिसात साक्ष न्युज चॅनलच्या पत्रकार चंचल सोनवणे, गौरी सोनवणे व प्रमोद सोनवणे यांचे विरुद्ध तक्रार दिली.
या आधारे पोलिसांनी साक्ष न्यूजचे पत्रकार असलेल्या चंचल सोनवणे, गौरी सोनवणे व त्यांचे वडील प्रमोद सोनवणे या तिघांविरुद्ध खंडणी मागणी व फसवणूक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.