मुंबई : ‘ज्याची बायको पळून जाते त्याचं नाव मोदी ठेवलं जात आहे’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. दरम्यान यावरून देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची झालेली अवस्था पाहाता नानांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. त्यामुळे मी त्यांच्या नेतृत्वाला सांगेन की त्यांनी त्यांच्या या युवा नेत्याला डॅाक्टरांना दाखवावं अशी टीका फडणवीस यांनी केलीय.
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पुन्हा आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. पटोले यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीतही पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
औरंगाबाद शहरातील सिडको बसस्थानक चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आंदोलक आणि पोलिसात झटापट झाली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाना पाटोले यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.