मुंबई : महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या अंदाजानुसार मध्यरात्री राज्यातल्या काही भागात पावसानं हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री राज्यातील मुंबई, ठाणे पालघर आणि नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावमध्ये पावसाने हजेरी लावली.
हवामान खात्याने काल मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. काल सकाळपासून याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच दक्षिण गुजरात आणि लगतच्या मध्य प्रदेशात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागांत पावसाला सुरुवात देखील झाली आहे.
आज कसा असेल पाऊस
आज महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. 23 जानेवारीनंतर राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांनी पुढील किमान 5 दिवस मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला. दरम्यान याठिकाणी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. वाऱ्यांचा वेग 60 किमी प्रतितास इथंपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.