जळगाव : नॉर्मल प्रसूतीनंतरही अचानक प्रकृती खालावून जळगावातील अपेक्स रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. पूजा जयप्रकाश विश्वकर्मा (वय ३०) असं मयत विवाहितेचं नाव आहे. बाळाचा चेहरा पाहण्याआधीच तिचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी नातलगांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप करत पोलीस तक्रार केली आहे.
याबाबत असे की, जळगावातील गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्वकर्मा हे वास्तव्यास आहेत. जयप्रकाश यांची पत्नी पूजा हिस प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी जळगावातील डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले.
याठिकाणी नार्मल प्रसूती होऊन मुलगा झाला. त्यानंतर सायंकाळी पूजा हिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला अपेक्स रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे डॉक्टरांकडून विश्वकर्मा कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
त्यानुसार पूजाला अपेक्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी हजारो रुपयांची औषधी मागवली. मात्र, तरीही त्यांचा जीव वाचला नाही. डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. मात्र, त्याचा चेहरा पाहण्याआधीच पूजाचा मृत्यू झाला.