जळगाव : एकीकडे थंडीचा जोर वाढलेला असतानाच राज्यात पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आज २२ जानेवारीला दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच रविवारनंतर पुढील ३ ते ४ दिवस जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी किमान तापमान १३.४ अंशावर तर कमाल तापमान ३० अंशावर हाेते. पहाटेच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १३ किलाेमीटरपर्यंत वाढलेला हाेता. शनिवारी देखील वाऱ्याचा वेग ताशी १३ ते १४ किलाेमीटरपर्यंत राहणार आहे. तर किमान तापमानात ६ ते ७ अंशापर्यंत घट हाेऊ शकते. रविवार ते बुधवारपर्यंत जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात घट हाेणार असल्याने या काळात गारठा वाढणार अाहे. उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता वाढणार आहे. दरम्यान, राज्यात पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे
आज या ठिकाणी पावसाची शक्यता?
हवामान खात्याने शनिवारी 22 जानेवारी रोजी मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड आणि रत्नागिरी या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून विकेंडला हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.