जळगाव : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2022-23 करिता ३५७ कोटी ४९ लक्ष रूपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त ६७ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी ४२५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात आज ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे कौतुक केले.
जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आज पार पडली. या बैठकीस जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आ. शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत पाटील, आ. अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, अधिष्ठाता श्री.रामानंद , सा.बा.चे अधिक्षक अभियंता गिरासे, सिव्हील सर्जन नागोजीराव चव्हाण, यांच्यासह विविध यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसधारण) सन २०२२ -२०२३ करिता ३५७ कोटी ५० लक्ष रुपयांचा नियतव्यय मर्यादा ठरवून दिलेली होती. मात्र, कार्यान्वयीन यंत्रणांनी ९८५ कोटी ८८ लक्ष रुपयांची मागणी केलेली आहे. त्यानुसार किमान १०० कोटी रुपयांची जादाची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली. त्यानुसार जिल्ह्याची कामांची निकड लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी ६८ कोटी निधीची वाढ केल्याने या निधीतून आरोग्य केंद्रांची बांधकामे, पाटबंधारे विभागाच्या योजना, रस्ते विकास, स्मशानभूमी कामे, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा वालकंपाऊंड, क्रीडा, अंगणवाडी बांधकाम व जिल्ह्यातील आरोग्य बळकटीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले .
नाविन्यपूर्ण मधिल कामांचे तसेच कार्यकारी समितीचे सदस्य व विशेष निमंत्रितांच्या नेमणुका याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक !
जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शाळा वॉल कंपाऊंड, शेत पाणंद रस्ते तसेच आरोग्याच्या बळकटी करणासाठी केलेल्या कामांचे तसेच कार्यकारी समितीचे सदस्य व विशेष निमंत्रितांच्या नेमणुका याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे व नियोजन विभागाचेही कौतुक केले. जिल्ह्यात १००% लसीकरणावर भर देऊन कोविड प्रतिबंधक संरक्षक डोस देण्याचे तातडीने नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. महसूल मधील प्रांत व तहसीलदार यांच्या वाहनांसाठी खर्च करण्याबाबत विचार करावा . या वर्षाचा १०० % निधी खर्च करण्याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या मागणीस यश
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची निधीबाबत सतत मागणी होत असते जिल्ह्यातील विकास कामांची निकड लक्षात घेता जिल्ह्यातील लोकोपयोगी कामांसाठी वाढीव निधी मंजूर करावा अशी मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्र्यांच्या आग्रहास्तव ६८ कोटी इतका वाढीव निधी मंजूर केला. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामाना चालना मिळणार आहे.
या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मागील वर्षाचा खर्चाचा आढावा सादर करून जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला प्रारूप आराखडा, जिल्ह्यातील कोविड बाबत केलेले कामांचा आढावा सादर केला. तसेच जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, नगरविकास, रस्ते विकास, शाळा वॉल कंपाउंड, स्मशानभूमी बांधकाम, इत्यादी कामांचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले.
विकास कामांना गती द्या
जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीतून जळगाव जिल्ह्यातील विकास कामांना गती द्यावी. दळण-वळणाच्या सुविधा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा सारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.