जळगाव : बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. शिवसेना पक्ष हा स्व.बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही गुपचूप काही करत नाही जे करतो ते समोर करतो असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता लगावला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठक झाल्यानंतर आ. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. बोदवड नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे ९ उमेदवार निवडणून आले याचा अर्थ जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात बोदवड शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
बोदवड नगरपंचायतीच्या निकालानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
‘बोदवड नगरपंचायतची निवडणुक स्थानिक स्वराज्य संस्थेची होती. त्या निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांसोबत युती करण्याची आम्हाला संधी होती. मात्र, आम्ही सर्व १७ जागांवर उमेदवार दिले. बोदवडमध्ये मैदान मारणं सोपं नव्हतं, पण आम्ही ते करून दाखवलंय. तिथल्या मतदारांना परिवर्तन घडवायचं होतं, ते झालेलं आहे. निवडणूक चुरशीची झाली. शिवसेनेचे ९ उमेदवार निवडून आले याचा अर्थ जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूनं आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असो की विरोधी पक्ष असलेला भाजप असो, या सर्वांच्या विरोधात शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी १७ उमेदवार रिंगणात उभे केले होते. शिवसेनेची एक पद्धत आहे. आम्ही काहीच गुपचूप करत नाही. आम्ही जे करतो ते सर्वांच्या समोर करतो, खुलेआम करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले