यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी येथे यात्रेसाठी मामाच्या गावी आलेल्या १० वर्षीय भाच्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भावेश साई नाथ बागुल (रा.कोळगाव ता.भडगाव) असे त्याचे नाव आहे.
याबाबत असे की, गावातील यात्रेनिमित्त डांभुर्णी येथील रहिवासी सागर अशोक सपकाळे यांच्याकडे बहिण व भाचे आले होते. शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायतीकडून नळांना पाणी पुरवठा सुरू होता. यावेळी सपकाळे यांच्या घरात पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावली होती. यादरम्यान घराच्या ओट्यावर पाणी सांडले. याच ओल्या ओट्यावर पंपाच्या वायरमधून वीज प्रवाह उतरला होता. नेमके यावेळी सागर सपकाळे यांचा भाचा भावेश बागुल (वय १०) हा खेळण्यासाठी पायात चप्पल न घालताच घराबाहेर निघाला. मात्र, ओल्या ओट्यावर शॉक लागून तो खाली कोसळून बेशुद्ध झाला. यानंतर त्याला जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. शुक्रवारी रात्री डांभुर्णीत अंत्यसंस्कार झाले.