जळगाव : भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यांना केकही भरवला. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
मागच्याच महिन्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खडसे समर्थक रमण भोळे यांनी अचानक उमेदवारी मागे घेऊन संजय सावकारे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्याच वेळी सावकारे यांच्या राजकीय निष्ठांची चर्चा सुरू झाली होती. त्याची पुनरुक्ती खडसे यांनी सावकारे यांना केक भरवल्यामुळे सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस ज्या आठवड्यात येतो त्याच आठवड्यात सावकारे यांचा वाढदिवस आहे. हे संकेत लक्षात घेऊन सावकारे यांनी या मोठ्या नेत्यांच्या रांगेत येऊन बसावे, असे सांगत खडसे यांनी सावकारे यांना राष्ट्रवादीत येण्याचे अप्रत्यक्ष आमंत्रणही दिले. त्यानंतर कार्यक्रम संपला. त्यामुळे सावकारे यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
आमदार सावकारे यांच्या मित्र परिवाराकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सत्कारासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्याऐवजी खडसे समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आधी बोलावण्यात आले. त्यामुळे मानापमान नाट्य रंगले असून रविवारी दिवसभर त्याचीच चर्चा राजकीय समूहांमध्ये सुरू होती.
गाेपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजलीचीही चर्चा
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी त्यांच्या स्मृर्तींना वंदन करणारे एक होर्डिंग देखील भुसावळ शहरात आणि जिल्ह्यातही चर्चेचा विषय झाले होते. जळगावात देखील असे होर्डिंग होते. मात्र, समाज माध्यमातून त्याची चर्चा सुरू होताच ते उतरवून घेण्यात आले.