मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आता दिल्लीत पोहोचला आहे. आता भाजपच्या महिला नेत्याने दिल्लीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अपशब्द वापरल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी ही तक्रार दाखल केली.
काय आहे प्रकरण?
शरद पवार यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.
संजय राऊत यांनी केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर कार्यकर्त्यांमध्ये सहभागी असलेल्या महिलांबाबतही चुकीचे शब्द वापरले आहेत, या आधारावरही असाही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राऊत यांच्या सारख्या घटनात्मक पदावर विराजमान झालेले नेते ज्यांची समाजाबद्दल जबाबदारी सामान्यांपेक्षा अधिक आहे. अशा बेजबाबदार आणि असभ्य व्यक्तीपासून संपूर्ण देशातील महिला आणि भाजप महिला मोर्चा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
दीप्ती रावत भारद्वाज यांनी मंडावली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच महिलांसाठी समाजिकरित्या अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

