चाळीसगाव प्रतिनिधी | कोरोनामुळे देशभरातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. त्यात चाळीसगाव-धुळे पॅसेंजरचा ही समावेश होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशात काही रेल्वे गाड्या सुरूही झाल्या आहेत. मात्र, चाळीसगाव ते धुळे पॅसेंजर बंदच हाेती. प्रवाशांच्या मागणीचा रेटा लक्षात घेऊन अखेरीस गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली ही रेल्वे गाडी सोमवार अर्थात १३ तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, कोरोना नंतरच्या काळात रेल्वे प्रवासाचे भाडे वाढले असल्याने या गाडीचे देखील भाडे डबल करण्यात आले आहे.
सुरूवातीला दिवसभरात केवळ दोनच फेऱ्या होणार असून पॅसेंजरचे स्वरूप बदलून आता ही गाडी मेेमू ट्रेन या प्रकारात धावणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या हजारो प्रवाशांना ६२१ दिवसानंतर दिलासा मिळणार आहे. रविवार साेडून आठवड्यातील सहा दिवसही मेमू ट्रेन धावणार आहे. या रेल्वे गाडीला विशेष गाडीचा दर्जा असला तरी तिकिट आरक्षणाची आवश्यकता नाही.
तर ५०० रुपयांपर्यंत दंड
मेमूतून प्रवास करणाऱ्याला प्रवाशाला मास्क, लसीकरणाचा नियम पाळावाच लागेल. पडताळणी केल्यानंतरच प्रवाशांना प्रवास करून दिला जाणार आहे. कोरोनाशी निगडित नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशाला सुमारे ५०० रुपयापर्यंतही दंड होऊ शकतो.
चाळीसगाव ते धुळे मेमू ट्रेनचे भाडे जास्त असेल. अगाेदर चाळीसगाव ते धुळे पॅसेंजरचे प्रवासाचे भाडे १५ रूपये हाेते. मात्र, कोरोना नंतरच्या काळात रेल्वे प्रवासाचे भाडे वाढले आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनचे प्रवास भाडे धुळे ते चाळीसगाव सुमारे ३५ रूपये असेल. दरम्यान, दोन वर्षांनंतर ही रेल्वेसेवा सुरू होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. चाळीसगावहून मुंबईला जाणाऱ्यांची या सेवेमुळे सोय होणार आहे. आता रविवारीही मेमू सुरु ठेवावी, अशी अपेक्षा आहे.