जळगाव प्रतिनिधी | देशभरात आता ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे (Omicron Variant) खळबळ उडाली आहे. त्यामुळे शासनाकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. जळगाव शहरात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचे दाेन डाेस घेतलेल्यांचे प्रमाण कमी आहे. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेने कठाेर पावले उचलायला सुरुवात केली आहे. दाेन डाेस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणाऱ्यांनाच पेट्राेल व खरेदीसाठी दुकानात प्रवेश द्यावा, असे आदेश मनपाने काढले आहेत. शहरातील सर्व व्यापारी संकुलांच्या अध्यक्षांसह पेट्राेलपंप चालकांना या अनुषंगाने नाेटीस बजावण्यात आली आहे. नियम न पाळणाऱ्यांना ५० हजारांचा दंड करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरातील बँका, हॉटेल, मॉलसह व मोठ्या दुकानांमध्येही लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. मनपाच्या निर्णयाची अंमलबजावणी ज्या अस्थापनांकडून केली जाणार नाही, अशा आस्थापना मालकांवर मनपाकडून मोठी कारवाई केली जाणार आहे. यामध्ये १० ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्राहक, वाहनधारकांकडून लसीकरणाचे प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी देखील संबधित आस्थापना मालकांवर देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन व मनपाने काढलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मनपा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. यासाठी प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत मनपाच्या इतर अधिकाऱ्यांवर देखील ही जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी विशेष पथकांची नियुक्ती देखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.