निंभोऱ्यातील अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
गावातील संशयितावर पोक्सोचा गुन्हा दाखल
धरणगाव प्रतिनिधी | तालुक्यातील निंभोरा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित तरुणावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. काही वेळाने अल्पवयीन मुलगी रात्री ९ वाजता लघुशंकेसाठी उठली. त्यांच्या गल्लीतील संशयित योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला ओढत नेले. तसेच एका घरात मुलीवर अत्याचार केला.
दुसरीकडे मुलगी घरात नसल्यामुळे आईने शोधाशोध केली. मध्यरात्री १२.३० वाजता पीडीत मुलगी घरी आल्यावर तिने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. याप्रकरणी मंगळवारी (दि.७) सायंकाळी धरणगाव पोलिस ठाण्यात पीडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित योगेश कोळी विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील संशयित योगेश कोळी याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. लवकरच संशयिताला गजाआड केले जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
संशयित झाला पसार
घटनेनंतर संशयित पसार झाला आहे. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल अमोल गुंजाळ करत आहेत. सहा वर्षांपुर्वी पीडीतेच्या वडिलांचे निधन झाले आहे.