लातूर : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील राठोडा गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. एका वेडसर आईने पोटच्या दोन वर्षाच्या पोराला विहिरीत फेकल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी समोर आलीय. सदरील वेडसर आईला निलंगा पोलिसांनी अटक केली आहे.
राठोडा (ता. निलंगा) येथील माया व्यंकट पांचाळ या महिला गेल्या अनेक दिवसांपासून वेडी झाली असून तिचा पती लातूर येथे खाजगी कंपनीत वॉचमन म्हणून काम करतो. पत्नी आणि दोन वर्षाचा एक मुलगा राठोडा येथे गावाकडे राहत होते. सदरील वेडसर महिलेने पोटच्या पोराला पाण्याने भरलेल्या विहिरीत टाकून दिले आणि घराकडे निघून गेली. सदरील लहान मुलाचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्यामुळे लोकांना आढळून आले असता गावातील लोकांनी निलंगा पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे व पोलिस निरिक्षक बाळासाहेब शेजाळ यानी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून सदरील मयत लहान मुलाचे प्रेत पाण्याबाहेर काढून निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात शेवविच्छेदन करत अंत्यसंस्कारासाठी प्रेत वडील व्यंकट पांचाळ यांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, सदरील आरोपी आई माया पांचाळ यांच्यावर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पोटच्या आईने आपल्या एकुलत्या एक मुलाला वेडाच्या भरात विहिरीत फेकून जीव घेतल्याने राठोडासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.